एक कप अमृत
36759
31
2
|   Feb 27, 2017
एक कप अमृत

नुकतेच काही कारणाने शनिवार पेठेत जाणे झाले. मधली तीन वर्षे सोडली तर मी जन्मापासून पुण्यातच राहीले आहे. पण शनिवार पेठ कुठे आहे ते आधी गूगल वर शोधावे लागले. पेठ म्हटले की माझा फार गोंधळ उडतो, नक्की कुठे ते लवकर लक्षात येत नाही. असो, चिरंजीवांना शाळेत सोडून मी निघाले. आमचे चिरंजीव लहान असल्याने त्यांना शाळेत सोडून मी पटापट ऑफिसची कामे करून घेते. म्हणून माझी सकाळची वेळ फार घाई गडबडीची असते. एक विशिष्ट घर क्रमांक शोधायचा होता. गूगल वर अंदाज घेतला पण तरी जरा शोधत फिरावे लागले. अचानक रिक्षात गरमागरम मस्त चहाचा सुगंध दरवळला. ढगाळ पावसाळी वातावरण होते, त्यामुळे चहा पिण्याची इच्छा होणे हे स्वाभाविकच. अमृततुल्यचा चहा आणि काॅलेजचे दिवस आठवले. घर सापडले आणि काम आटोपून घेतले.

मग विचार केला, त्या चहाच्या वासाच्या दिशेने चालत जावे आणि बघावे ती टपरी सापडते का. सगळीकडे ग्राफिक्स आणि डिजिटल प्रिंटिंगची छोटी छोटी दुकाने होती . नवीन ठिकाणी फिरायला मला मजा येत होती. मी इकडे तिकडे डोकावत होते. तेवढ्यात चहाचा वास पुन्हा आला. पटापट चालून एक "गायत्री टी कॅन्टीन " पाशी पोचले. तिथे बघते तर लोकांची फार गर्दी होती. सगळी पुरुष मंडळी, त्यातून कामगार वर्ग. विचार केला आपल्याला काय ईथे झेपणार नाही. निराशा वाटली थोडी. जाउदे, आपण रिक्षा शोधून परत जाऊ असा विचार आला. पण थोडे पुढे गेले तर एका झाडाखाली एक काकू चहा पिताना दिसल्या. मग काॅलेजचे विद्यार्थी दिसले. वाटले हे प्रकरण आपल्या लागी आहे. वैजनाथ अमृततुल्यचे दर्शन झाले. एक चहा "टू गो " मागितला. तिथे काम करणारा माणूस ग्लास भरायला लागला तेवढ्यात मी विचारले, "किती पैसे झाले?" तो माझ्याकडे ही वेडी का खुळी या भावनेने बघत उभा राहिला. मागून जीन्स आणि टीशर्ट घातलेला त्याचा मालक आला आणि म्हणाला, "अरे सांग त्यांना दहा रूपये. काही लोकांना माहीत नसते". मला खुदकन हसू आले आणि पैसे देऊन मी ग्लास हातात घेतला. मसाला युक्त भरपूर उकळलेल्या चहाचा एक घोट घेतला आणि झाकीर हुसेन वाह ताज म्हणतात तसे मी आकाशाकडे पाहात तृप्त मनाने वाह देवा असे म्हणाले.

तेवढ्यात रिक्षा पण मिळाली. आई वडिलांनी शिकवलेले मॅनर्स आठवले म्हणून रिक्षावाल्या काकांना विचारले चहा घेणार का. ते खुष झाले पण हसून नको नको म्हणाले. मग ईतक्या खुशीत रिक्षा चालू केली की अर्धा चहा माझ्या ड्रेसवर (हो, काहीही सांडायचे असले की मी पांढरा ड्रेसच घातलेला असतो). सांगितले, "आहो काका चहा सांडत आहे, हळू चालवा ना प्लिज". तशी काकानी "साॅरी हा ताई", म्हणून रिक्षा हळू केली. उरलेला चहा अगदी एंजॉय करत प्यायले. काही दिवसांपासून जरा दगदग झाली होती, थकवा जाणवत होता, पण त्या 30 मिली चहाने आणि नेहमी पेक्षा वेगळाच उद्योग केल्याने तो सगळा नाहीसा झाला. उड्या मारत चिरंजीवांना घ्यायला शाळेत पोचले.

Read More

This article was posted in the below categories. Follow them to read similar posts.
LEAVE A COMMENT
Enter Your Email Address to Receive our Most Popular Blog of the Day