आज पुन्हा आईची शाळा सुरु झाली...
15632
21
1
|   Jun 15, 2017
आज पुन्हा आईची शाळा सुरु झाली...

३ दिवसांपासून तिची चांगलीच तयारी सुरु होती, तिची छकुली आज पहिल्यांदा शाळेत जाणार होती.

छकुली साठी उत्तम शाळा शोधली होती तिने, दप्तर, डबा, पाण्याची बाटली, गरज नसली तरी पेन्सील,कलर पेन्सिल, किती किती आणि काय काय, सर्वं काही हाय क्वालिटीचे घेतले होते तिने.

छकुली बिनधास्त होती, तिला त्या शाळेच्या सामानाचे विशेष काही वाटत नव्हते, आई मात्र सारखं-सारखं सर्वं बघत होती आणि मनातल्यामनात खुश होत होती. आजतर आईने सकाळी लवकर उठून विशेष पदार्थ बनवून तिचा डबा तयार केला होता. ती शाळेतून आल्यावर तिला द्यायला एक मोठी कॅडबरी ही आणून ठेवली होती.

एकीकडे आई खुश होती की तिची छकुली आता घराबाहेर पडणार, तिची नव्या जगाशी ओळख होणार पण सारखे आत काही तरी निसटून जात असल्या सारखे वाटत होते, पण आपल्याच भावनांकडे दुर्लक्ष करून ती छकुलीला तयार करत होती. छकुली तयार झाली, बाबांनी गाडी काढली, छकुलीचा शाळेचा पहिला दिवस म्हणून दोघेही तिला सोडायला जाणार होते, खरेतर चिमुकल्या छकुलीची शाळा होती फ़क़्त दोनच तास, आणि मग आई-बाबा दोघेही आपली बाहेरची इतर कामे आटोपणार होते.

बाबांनी गाडी काढली, आई छकुलीला मांडीवर घेवून बसली, एरवी आई छकुलीला नेहमीच मागे बसायला लावायची, आणि छकुली आईच्या मांडीवर बसायचा हट्ट करायची, पण आज तर आईच छकुलीला मांडीवर घेवून बसली, एकीकडे आई सारख्या तिला सूचना करत होती, आणि एकी कडे तिच्या गालाचे-कपाळाचे पापे हि घेत होती. बाबा सर्वं काही शांततेत बघत होता.

शाळा आली आणि गाडी थांबली, आईच्याच पोटात गोळा आला, छकुली मात्र माझी शाळा म्हणून खुश झाली, आई छकुलीला घेवून पुढे गेली, तिथल्या टीचरने छकुलीचा हात पकडला, पण छकुली ने आईचा हात घट्ट पकडून ठेवला (तसा आईने हि तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता), टीचर प्रेमाने छकुलीला जवळ घेत होती, छकुली नाही म्हणत होती, पण मग टीचरने छकुली ला शाळेतील छान-छान खेळणी दाखवली आणि छकुली टीचर सोबत आत जायला तयार झाली, तिने आईला बाय पण केले, आईने हि बाय केले पण छकुली पेक्षा आईच्याच डोळ्यात पाणी होते, आईला काळजाचा तुकडा तोडून दिल्यासारखे वाटत होते, आईला वाटले कि ती पहिल्यांदा शाळेत गेली होती तेंव्हा तिला असेच वाटले असेल बहुतेक.  

बाबाला हि वाईट वाटतच होते, आईचे मन रमवावे म्हणून बाबा तिला बाहेर घेवून जाणार होता, पण आईचा पाय काही निघत नव्हता शाळेतून, शेवटी बाबा आणि आई दोघेही शाळेच्या बाहेरच थांबले २ तास. एकदाची शाळेची घंटा वाजली, आणि आईची नजर छकुलीला शोधू लागली. छकुली मस्त हसत बागडत बाहेर येताना दिसली आणि आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रूंनी गर्दी केली, पण हे अश्रू मात्र आनंदाचे होते बरं!!        

Read More

This article was posted in the below categories. Follow them to read similar posts.
LEAVE A COMMENT
Enter Your Email Address to Receive our Most Popular Blog of the Day